एक तारी संगे एकरूप
झालो: सुधीर फडके
यंदाचं वर्ष आम्हा संगीत, साहित्य आणि नाट्य प्रेमींसाठी उत्सवाचं वर्ष आहे, उत्सवाचं! अरे का म्हणजे काय?
प्रत्येकाचे कसे आपल्या
आवडीचे देव असतात, तसे हे आम्हा रसिकांचे
देव आहेत देव! या आमच्या तीन देवांचं
जन्मशताब्दी वर्ष आहे. २०१८-२०१९ म्हणजे उत्सवच
नाही का? आमचे हे देव आहेत सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे.
आज २५ जुलै २०१८ ला बाबूजी अर्थात सुधीर
फडके यांच्या जन्म शताब्दी वर्षाला सुरवात होते आहे. माझ्या सकट चार पिढ्यांच पालन
पोषण ज्यांच्या संगीतावर झालं, आणि या पुढल्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल
असं चिरंतन संगीत बाबूजीनी आपल्याला दिलं. कधीही ऐका अगदी 'काय देवाची सांगू बातं' या पुढलं पाऊल चित्रपटापासून ते हेच नाव असलेल्या ८० च्या दशकातल्या 'एकाच या जन्मी जणू' या ४०-४५ वर्षातल्या त्यांच्या कारकिर्दीत कधीही तोच तोच पणा वाटला नाही, म्हणून बाबूजींनी केलेली
गाणी आजही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. म्हणजे जस वर्षातून एकदाही पुरणाची पोळी
होत नसेल, दिवाळीचा फराळ होत नसेल तर ते मराठी घर नाही
तसंच जर गदिमा आणि बाबूजींची गाणी ऐकल्या जात नसतील ते मराठी घर नाही!
माझी स्वतःची बाबूजींची
एक आठवण आहे, मी अगदी ५-६ वर्षांचा असेन (माझं सगळं
लहानपण नागपुरात गेलं अगदी महाविद्यालयीन शिक्षणही नागपुरातच झालं) साधारण ८०-८२ची
गोष्ट. बाबूजी नागपूरला आले होते. नागपूर, रेशीमबागला स्मृती मंदिराच्या
पटांगणात त्यांच्या संघाच्या काही गीतांचे विमोचन होते. आम्ही घरची सर्व मंडळी झाडून हजर होतो त्या कार्यक्रमाला. बाबूजी स्वतः
संपूर्ण गणवेषात होते, त्यांच्या समोर एका टेबलावर पेटी ठेवली होती आणि त्यांनी गायला सुरवात केली
'चाहिये आशिष माधव
नम्र गुरूवर प्रार्थना..... ' आणि याच्या जोडीला आणखीन एक गीत होतं ते म्हणजे
"लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष....' संपूर्ण गणवेषातले बाबूजी आठवतात पण
त्या लहान वयात हे खूप मोठे संगीतकार वैगेरे आहेत याचं ज्ञान नव्हतं.
बाबुजीं जसे उत्तम
संगीतकार तसेच ते एक सच्चे देशभक्त आणि प्रखर राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. गोवा, दादरा आणि नगर हवेली मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग, सहभागच काय तर ज्या मंडळींनी मिळून हे आंदोलन उभारलं त्या ८-१० मंडळीत बाबूजी
अग्रगणी होते. पोर्तुगीज किती तयारीत आहेत किंवा त्यांच्याकडे पोलीस बळ किती
याची खडा न खडा माहिती मिळावी म्हणून सुधीर फडके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ललिता
फडके यांनी दीव दमण ला एक गाण्याचा कार्यक्रम घेतला होता.
गीत रामायण आणि त्यांचं
संगीत या विषयावर अनेकांनी लिहिलं आहे, जाणकारांनी त्याचा जवळून
अभ्यास केला आहे आणि तो सुरूच राहणार आहे. मी काही जाणकार नाही आणि बाबूजींच्या
संगीतावर लिहिण्याइतकी माझी योग्यताही नाही. पण जाता जाता एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे जी मी बाबूजींच्या निधनानंतर प्रसिद्ध निवेदक
स्व. भाऊ मराठे यांच्या कडून ऐकली होती तेवढी सांगतो. "बाबुजींच्या निधनानंतर
शिवाजी पार्कला त्यांच्या निधनाबद्दलचा एक फलक लागला होता, त्याच्या शेजारी एक माणूस रडत बसला होता. भाऊ मराठेंनी त्या माणसाला विचारलं
की तू इथं बसून का रडतोस रे बाबा?
तर त्यांनी डोळे पुसले
आणि आपलं रडणं कस बस आवरतं घेत तो म्हणाला "मी आयुष्यभर लोकल मध्ये यांची
गाणी गायली आणि आपलं पोट भरलं. साहेब तुम्हाला कल्पना नाही की बाबूजी माझ्या
साठी काय आहेत" किती बोलकी आणि हृदयस्पर्शी प्रतिक्रिया आहे. बाबूजींचं गदिमा
यांचं गीत-संगीत किती सर्वव्यापी आणि खोल रुजलं होत हे लक्षात येत. - अमोल दांडेकर
ऋणनिर्देश: आसावरी दांडेकर (पेन्सिल स्केच), अभिजीत देवघरे ( रंगीत स्केच)
